मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. ती आता मागे पडली असून शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे नाव निश्चित झाले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली. त्यांनतर राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग येत शिवसेनेतर्फे सहाव्या जागेसाठी ४ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. यासंदर्भात अनेक तर्क वितर्क आणि चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे.
शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खा. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले आहे. तर संजय पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे आमचे दैवत आहे. त्यांच्या अपमान होईल किंवा त्यांच्याशी स्पर्धा करण्याइतपत मोठा नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढा असा आदेश दिला तर मला लढावेच लागेल, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.
संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी असून ते मावळे असल्यानेच राजे असतात असे म्हणत खा. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे छत्रपती संभाजीराजेंना टोलाही लगावला आहे.