Home Cities जळगाव आपत्तीग्रस्तांसाठी संजय गरुड यांचा मदतीचा हात ; मुख्यमंत्री फडणवीस यांना रु. ७.१०...

आपत्तीग्रस्तांसाठी संजय गरुड यांचा मदतीचा हात ; मुख्यमंत्री फडणवीस यांना रु. ७.१० लाखांचा निधी सुपूर्द

0
163

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठा गोंधळ उडवून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी समाजातील जबाबदार घटकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत भाजपा नेते व माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. ७,१०,६६६/- चा धनादेश सुपूर्द केला.

धुळे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जळगाव विमानतळावर घेऊन संजयदादा गरुड यांनी आपली मदत थेट त्यांच्या हस्ते सुपूर्द केली. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, किशोर पाटील, अमोल जावळे, राजू भोळे, अरविंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

संजयदादा गरुड यांच्यासह शेंदुर्णीतील विविध संस्थांनी – धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी, आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था, शेंदुर्णी सहकारी फळ विक्री संस्था, श्री त्रिविक्रम महिला सहकारी दूध उत्पादक संस्था – या सर्वांनी मिळून ही मदत उभी केली आहे. गरुड कुटुंबीयांनी व्यक्तिगत योगदानही दिले असून सौ. सरोजिनी संजय गरुड (माजी जि.प. सदस्या) यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

या प्रसंगी संजयदादा गरुड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचविण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, पिकांचे पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे, अन्यथा या संकटातून सावरणे कठीण होईल. सरकारने मदतीचे वितरण गतीमान करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

शासनाच्या यंत्रणेला हातभार लावत, समाजातून पुढाकार घेत दिलेल्या या योगदानामुळे शेतकरी व पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. “फुल ना फुलाची पाकळी” म्हणून गरुड कुटुंबीयांनी आणि शेंदुर्णीतील संस्थांनी दाखवलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Protected Content

Play sound