सांगली (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील गार्डी येथे १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून आणि तिचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आरोपी अनुज पवार, दादासाहेब आठवले आणि लक्ष्मण सरगर या आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. २०१२ साली गार्डी शहरातील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. यानंतर सात वर्षांनी न्यायालयाचा निर्णय आला आहे.
विटाजवळच्या गार्डी इथे 12 ऑक्टोबर 2012 रोजी एक 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला होता. संबंधित तरुणी प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा 16 ऑक्टोबर रोजी विट्यातील एका पडक्या विहिरीत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत मुलीचे गावातील लक्ष्या उर्फ लक्ष्मण सरगर याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सरगरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मित्रांसह तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो विहीरीत फेकून दिल्याची कबुल लक्ष्मण सरगरने दिली होती. यानंतर विटा पोलिसांनी मृत तरुणीचा प्रियकर लक्ष्मण सरगर, अनुज अर्जुन पवार आणि दादासो भास्कर आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालयात 16 जुलै 2019 रोजी खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.