Home करियर संघपाल तायडे यांना मानाचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्कार प्रदान 

संघपाल तायडे यांना मानाचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्कार प्रदान 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्कार यंदा जळगाव जिल्ह्याचे नाव देशविदेशात पोहोचवणारे खाकी वर्दीतील सुरेल गायक संघपाल तायडे यांना प्रदान करण्यात आला. पोलिस दलातील कर्तव्य बजावत असतानाच कलाक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या या दर्दी गायकाच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी अभिमान व्यक्त केला.

खान्देश नाट्य महोत्सव 2026 च्या औचित्याने या पुरस्काराची यंदापासून सुरुवात करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आयोजन Obenol Foundation या नामांकित संस्थेमार्फत करण्यात आले. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. Sanjay Savkare, अश्विनकुमार परदेशी, नाहाटा कॉलेजचे चेअरमन मोहन फालक, श्रीमती नम्रता परदेशी, राधेश्याम लाहोटी, शकील हसरत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संघपाल तायडे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघपाल तायडे यांचे गाण्याचे व्हिडिओ मला मंत्रालयात तसेच राज्याबाहेरूनही अनेकांनी पाठवले. ‘तुमचा जळगावचा पोलिस किती सुरेल गातो’ असे कौतुकाने सांगितले जात होते. संघपाल यांच्या कलेमुळे माझीही वेगळी ओळख निर्माण झाली. आज प्रत्यक्ष या खाकी वर्दीतील गायकाला पुरस्कार प्रदान करताना अभिमान वाटतो आहे.” पुढे त्यांनी संघपाल तायडे यांनी भविष्यातही कलाक्षेत्रात तसेच जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार स्वीकारताना संघपाल तायडे म्हणाले की, “आजवर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत खास आहे. खान्देशच्या मातीतून मिळणारा हा सन्मान माझ्या खांद्यावर अधिक मोठी जबाबदारी टाकणारा आहे. येत्या काळात पोलिस दलातील कर्तव्य आणि कलाक्षेत्र या दोन्ही ठिकाणी उज्ज्वल कामगिरी करून जळगाव जिल्ह्याचे नाव अधिक उंचावण्याचा प्रयत्न करेन.”

या सोहळ्यासाठी कला रसिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि पोलिस दलातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संघपाल तायडे यांच्या गायन प्रवासाचा आढावा घेण्यात आला आणि त्यांच्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


Protected Content

Play sound