संघाच्या बदनामी प्रकरणी राहूल गांधी यांना जामीन

हंदकीप

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक कार्यकर्ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध जोडल्याप्रकरणी मुंबईतील शिवडी कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना हा जामीन दिला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसविरोधी ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सुनावणीसाठी शिवडी कोर्टात पोहोचले. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड आणि नसीन खान हे राहुल गांधी यांच्यासाठी हमीदार राहिले. राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध आरएसएसशी जोडणारे ट्विट केले होते. दरम्यान, माझी विचारांची लढाई सुरूच राहणार असून, गेल्या ५ वर्षांच लढलो त्यापेक्षा अधिक तीव्रतेने या पुढे लढणार असल्याचे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

कोर्टात हजर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. आपण या प्रकरणी आपण दोषी नसल्याचे त्यांनी कोर्टापुढे मांडले. काँग्रेस नेते राहुल गांधी शिवडी कोर्टात दाखल होत असताना काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी शिवडी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत, पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आज सकाळी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राहुल गांधींचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या व्यतिरिक्त राहुल यांना आणखी ४ प्रकरणांसाठी देशातील वेगवेगळ्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या विचारधारेशी जोडण्याच्या आरोपाखाली राहुल गांधी आणि कम्युनिष्ट नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. याच प्रकरणावरील सुनावणीसाठी राहुल मुंबईतील शिवडी कोर्टात हजर झाले आहेत. आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी राहुल यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. मानहानीप्रकरणी चंपानेरकर यांनी दोन्ही नेत्यांकडून १ रुपयाची मागणी केली आहे. आरएसएसला गोरी लंकेश यांच्या हत्येशी जोडून राहुल यांनी संघटनेची बदनामी केली आहे, असे चंपानेरकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. राहुल यांनी राजीनामा देऊ नये असे राज्यातील नेत्यांनीही शिवडी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत मांडले. आज देश विचित्र अवस्थेतून जात आहे. अशावेळी राहुल यांनी अध्यक्षपदावर राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले.

Protected Content