रामनवमी निमित्त शेगावात भाविकांचा जनसागर !

बुलढाणा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील संत गजानन महाराजांची पावन नगरी शेगाव येथे आज रामनवमीच्या निमित्ताने भक्तांचा प्रचंड जनसागर उसळला आहे. “गण गण गणात बोते” आणि “राम नामाचा गजर” करत लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आलेले हे भक्त कालपासूनच शेगावात दाखल होत आहेत.

शेकडो भजनी दिंड्याही शेगावात दाखल झाल्या असून, सकाळी काकड आरती पार पडली. दुपारी श्रींचा पालखी सोहळा होणार आहे. संत गजानन महाराज शेगावात आल्यानंतर रामनवमीचा उत्सव येथे अव्याहत पणे साजरा केला जात आहे आणि आजही तो तितक्याच श्रद्धेने व भक्तीभावाने साजरा होत आहे.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानने मंदिर काल रात्रीपासूनच भक्तांसाठी खुले ठेवले असून, आजही मंदिर अखंड खुले राहणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या दर्शनासाठी तीन तासांचा कालावधी लागत असून, शेगावात भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा शिखरावर पोहोचल्याचे दिसून येत आहे.

Protected Content