वाळू तस्कर माजले : एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर काल रात्री उशीरा वाळू तस्करांनी हल्ला करत प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. राजकीय आश्रय असल्याने रेती माफिया हे कुणास जुमानण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर हल्ले होत असून अशीच धक्कादायक घटना काल रात्री एरंडोल तालुक्यात घडली आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण अ. ह. शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या सहकार्‍यांसह कारवाई करण्यासाठी गेले होते. ख्वाजा मिया दर्ग्याजवळ ते गेले असता तेथे दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यातील बरेचसे वाहने घेऊन पळून गेले. मात्र दोन ट्रॅक्टर्स तेथेच असल्याने महसूल पथक कारवाई करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. याप्रसंगी, चार-पाच जणांनी आवाज देऊन इतरांना बोलावले. या सर्वांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. सहकार्‍यांनी प्रतिकार केल्याने अनर्थ टळला. तर, या गुंडांनी महसूल पथकावर जोरदार दगडफेक केली. यात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह सहकारी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी यांनी कासोदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, आकाश राजेंद्र पाटील, अमोल ( पूर्ण नाव माहित नाही ); राहूल ( पूर्ण नाव माहित नाही ); दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर ( पूर्ण नाव माहित नाही ) या सर्वांच्या विरोधात भाग ५, गुरनं ०१/२०२४ भादंवि कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

मनीषकुमार गायकवाड यांच्यावर आधी वाळू तस्करांनी पाळत ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर आता वाळू तस्करांनी थेट त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय पाठबळ असल्याने वाळू माफिया माजले असून त्यांनी आता प्रांताधिकार्‍यांचा खून करण्याचा प्रयत्न केला असून आता तरी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणार का ? असा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.

Protected Content