Home क्राईम गिरणा नदी पात्रात वाळू माफियांचा उच्छाद ; ठेक्याच्या नावाखाली बेसुमार वाळू वाहतूक...

गिरणा नदी पात्रात वाळू माफियांचा उच्छाद ; ठेक्याच्या नावाखाली बेसुमार वाळू वाहतूक !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निंभोरा-वाकटुकी परिसरातून वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रात सध्या वाळू माफिया आणि महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दिवसाढवळ्या चोरीला जात आहे. हजारो ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन होऊनही स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मर्यादेपेक्षा जास्त उपसा आणि ‘अर्थपूर्ण’ शांतता :
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी केवळ १८७४ ब्रास वाळूचा अधिकृत ठेका १२ जानेवारी २०२६ पासून देण्यात आला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाला सुमारे २०० ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे. २८ जानेवारीपर्यंतची आकडेवारी पाहता, ठेक्याची मर्यादा कधीच संपली असण्याची शक्यता आहे. असे असतानाही धरणगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तलाठी या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई निर्माण झाली आहे.

दिखाऊ गस्त आणि दिवसा चोरी :
एकीकडे अधिकारी रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना गस्त घालण्यासाठी रस्त्यावर पाठवतात. मात्र, हा केवळ देखावा असून दिवसाढवळ्या वाळू माफियांसोबत हातमिळवणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. या प्रकाराला काही बड्या राजकीय नेत्यांचे अभय लाभले आहे का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ :
धरणगाव तालुक्यात वाळू माफियांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद आहेत. एकीकडे कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करत असताना, दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी आणि माफिया यांच्यातील संगनमतामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound