यावल, प्रतिनिधी | येथील महसुल विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या हेतुपुरस्पर दुर्लक्षीतपणामुळे परिसरात अवैध वाळु माफीयाने सर्वत्र धुमाकुळ माजविला आहे. यावाळु माफीयांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांनी नेमणुक केलेले सर्व पथक हे निष्कामी ठरत असल्याने वाळु माफीयांचे प्रस्थ दिवसंदिवस वाढत जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील विस्तारीत वसाहतीत नव्या इमारतीचे बांधकाम हे अत्यंत वेगाने वाढत जात असुन या नविन बांधकामासाठी लागणारी वाळु ही अनधिकृत वाळु माफीयाकडुन चढत्या भावानेखरेदी केली जात आहे. वाळु विक्रीला शासनाची बंदी असतांना काही वाळुची तस्करी करणारी मंडळीही अज्ञातस्थळी वाळुची साठवणूक करुन अत्यंत शिताफीने चोरटया मार्गाने शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस पाहुन तथाकथीत पुढारी मंडळी पक्षाच्या नांवाखाली आपले राजकीय दबावतंत्रचा सर्रासपणे वाळुची अनाधिकृतपणे तस्करी करीत असल्याचे दिसुन येत आहे. यावाळु माफीयांचे स्थानिक महसुल अधिकाऱ्यांशी आर्थिक साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. प्रांत आधिकारी डॉ . अजीत थोरबोले आणि यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी वाळुमाफीयावर कारवाई व्हावी या करीता यावल तालुक्यात तलाठी आणी मंडळ अधिकारी यांच्या सात पथकांची नेमणुक केली. मात्र, या पथकाने आजपर्यंत एकही अनाधिकृत वाळु तस्करी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नसल्याने या पथकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या संदर्भात वरिष्ठांनी लक्ष दिल्याशिवाय या खुलेआम अनधिकृतपणे वाळुची तस्करी करून लाखों रूपयाचा महसुलीकर बुढवणाऱ्या माफीयावर वचक बसणार नाही तसेच या वाळु माफीयांशी आर्थिक स्वार्थ साधणाऱ्या त्या अधिकारी यांच्यावर देखील प्रशासकीय पातळीवर कारवाई झाल्याशिवाय कुठल्याही कायद्यास न जुमानता राजरोसपणे वाळुची तस्करी करणाऱ्यांवर प्रतिबंध घालता येणार नाही असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.