जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘लोक संघर्ष मोर्चा’मार्फत ‘समृध्द महिला संकल्प परिषद’ शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी जी एस ग्राउंड, जळगाव येथे मा.खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार आहे.
लोकसंघर्ष मोर्चा ग्रामीण व आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत आहे. यात संघटनेचा भर हा ग्रामीण व अदिवासी क्षेत्रातील नैसर्गिक संसाधने व त्यावरचा लोकांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठीचा राहिला आहे एक प्रदीर्घ संघर्ष लोकशाही व अहिंसक मार्गाने संघटनेने यशस्वी करून दाखवला आहे.
शेतकरी कुटुंबातील महिला ही खरी शेतीचा कणा आहे. शेतकरी महिला जिने शेतीचा शोध लावला ती आता पुन्हा एकदा शेतीत जी आज दुरवस्था आहे ती दूर करण्यासाठी व समृद्ध शेतीचा संकल्प करण्यासाठी १५ एप्रिलला मोठ्या संख्येने प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येते आहे. केवळ शेतकरी महिलाच नाही तर शहरी भागातील मोलमजुरी करणारी कष्टकरी महिला असेल अल्पसंख्यांक बेरोजगार महिला असेल कोरोना मध्ये जिने आपला पती गमावला अश्या एकल महिला असतील अश्या सर्व महिलांची ताकद १५ तारखेला आपलं जीवन समृद्ध करण्याचा निर्धार घेऊन एकत्र येणार आहेत
या महिलांचे काही प्रश्न आहेत त्याच बरोबर त्यावरचे उपाय शासकीय योजना यांचा लाभ कसा या महिलांपर्यंत पोहचनार त्याबाबतचे त्यांनी स्वतः कृति कार्यक्रम बनवले आहेत आणि हे शासनापुढे मांडून त्यांचा सहभाग घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल याची घोषणा या परिषदेतून होणार आहे.
हे वर्ष तर महाविकास आघाडीने महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून जाहीर ही केले आहे. त्या निमित्ताने कुटुंबातील महिलांनी पुढे येत शासनाच्या योजनांची अंमलबजावणी स्वतः च्या सहभागातून कशी करून घेता येईल व खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही परिषद आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी ही संकल्पना राबविण्यासाठी संमती देत संबंधित सर्व विभाग म्हणजे कृषी, जलसंपदा , आदिवासी विकास, वनविभाग पशुसंवर्धन व ऊर्जा विभाग या खात्यांचे सर्व मंत्री सोबत घेऊन या शेतकरी शेतमजूर कष्टकरी व अल्पसंख्याक महिलांच्या समृद्धीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कसा मार्ग काढता येईल हे ठरवण्यासाठी या परिषदेत उपस्थित रहाणार आहेत तसेच नव्या विकासाचे संकल्प व निर्धार करत या महिलांच्या या अभियानात शासन कसे सोबत उभे राहिल हे जाहीर करणार आहेत.
आजपर्यंत महिला मेळावे नेहमीच झाले आहेत परंतु प्रथमच शेतकरी महिलांनी एकत्र येत शासणासोबत समृद्धी चा संकल्प करण्याची घटना ही प्रथमच होते आहे त्याच बरोबर केवळ शेतकरीच नाही तर शेतमजूर अल्पसंख्यांक बेरोजगार व शहरी कष्टकरी महिला ही एकजूट करत प्रथमच महिला शक्तीचा संघटित होत केवळ मागण्याचं नाही तर आपल्या विकाससाचा संकल्प करणारी अश्या पद्धतीची ही राज्यातील पहिलीच महिला परिषद ठरणार आहे.
या परिषदेला येणारे मान्यवर –
अध्यक्ष मा.खा.शरद पवार साहेब , मा.ना.बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री), मा.ना.जयंत पाटील (जलसंपदा मंत्री), मा.ना.दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री), मा.ना.दादा भुसे (कृषी मंत्री), मा.ना.गुलाबराव पाटील (पालकमंत्री जळगाव) , मा.ना.के.सी.पाडवी (आदिवासी मंत्री), मा.ना.दत्तात्रेय भरणे (वन मंत्री), मा.ना.प्राजक्त तनपुरे (ऊर्जा राज्यमंत्री)
या पत्रकार परिषदेत लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अल्पसंख्याकांचे नेते करीम सालार, नूतन मराठा अध्यक्ष विजय पाटील, एजाज मलिक, युवा लोक संघर्ष मोर्चा अध्यक्ष भरत कर्डिले, मिर नाजिम अली, रागिब अहमद, विजय देसाई, योगेश पाटील, नाना महाले, फईम पटेल, फारुख कादरी, सुप्रिया चव्हाण, आईशा मणियार, रफिक पटेल, अजय बरेला, आरती पाटील हे हजर होते.