Home Cities जळगाव राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडी, विविध योजनांचे वाटप

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडी, विविध योजनांचे वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा परिषदेत सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नंदा रायते, उपयुक्त राकेश महाजन, राजेंद्र कांबळे आणि नाट्यकलाकार शंभू पाटील यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र, वसतिगृह प्रवेश पत्र यांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी आणि लाभांचे वाटप करण्यात आले.

आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सामाजिक न्याय धोरण हे गोरगरीबांना न्याय देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे.” शाहू महाराजांनी आदर्श राज्यकर्त्याचे उदाहरण समाजासमोर ठेवले, त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला असेही ते म्हणाले. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी एकत्र येऊन ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शाहू महाराजांना प्रशासकीय सुधारणांचे जनक संबोधले. त्यांनी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुधारणांवर शाहू महाराजांनी भर दिला होता, असे नमूद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “जातीमुक्त समाज” या स्वप्नाची पायाभरणी शाहू महाराजांनीच केली, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. त्यांनी मानसिक शक्तीचे महत्त्व आणि व्यसनमुक्त जीवनाची गुरुकिल्ली यावरही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेऊन त्यातून शिकण्याचा संदेशही त्यांनी दिला.

या कार्यक्रमात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काढण्यात आलेल्या समता दिंडीने झाली. सामाजिक समतेचा संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समाप्त झाली. यावेळी नाट्य कलाकार शंभू पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर विस्तृत मार्गदर्शन केले, तर विनोद ढगे यांच्या चमूने विविध पथनाट्ये सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound