फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निष्कलंक धाम वाढोदे येथे आयोजित केलेल्या समरसता महाकुंभाची धर्म ध्वज सभामंडप व अग्नीची पूजा करून सांगता करण्यात आली.
निष्कलंक धाम वढोदे फैजपूर येथे सतपंथ चारिटेबल ट्रस्ट तथा अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवाराने आयोजित केलेल्या समरसता महाकुंभात तुलसी हेल्थ केअर सेंटर लोकार्पण व श्री जगन्नाथ गौशाळा भूमिपूजन समारंभ आदी कार्यक्रम भारत भूमीतील संत परंपरेतील धर्माचार्य, पिठाधिश्र्वर, जगद्गुरु, महामंडलेश्वर यांचे सह असंख्य संत महात्मे यांच्या शुभहस्ते व आशीर्वाचनाने मोठ्या थाटात, उत्साहात साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाची सांगता आज १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी धर्माध्वजाची पूजा करून सन्मानपूर्वक खाली उतरविण्यात आला. त्याचबरोबर भव्य सभामंडप व रसोई घरातील अग्नीची पूजा करून त्यांना नमन करून शांत करण्यात आले.
१५ डिसेंबर २०२२ रोजी समरसता महाकुंभाच्या धर्माध्वजाची स्थापना संत – महंत यांच्यासह सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्या दिवसापासून कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या पायात पादत्राणे न घालता अनवाणी राहून सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले. त्यांचा संकल्प आज पूर्णतः सिद्धीस गेल्याने ज्योत्स्नाताई ठोंबरे व महाराजांच्या मातोश्री यांच्याहस्ते पुरोहित रत्नपारखी महाराज जळगाव यांच्या मंत्र उपचाराने विधिवत पाद्यपुजन करून पादत्राणे पायात घातली.
यावेळी महाराजांसह सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. उपस्थित सर्व सद्गतीत झाले. यावेळी परमपूज्य श्री राधे राधे बाबा, परमपूज्य अनिला आनंद महाराज, परमपूज्य सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामी भक्ती स्वरूपदासजी यांच्यासह अयोध्या येथील सुमारे ५५ त्यागी संत महंत, एकदंत महाराज प्रवीणभाई पटेल आदी सतपंथ परिवारातील भक्तगण, स्वयंसेवक उपस्थित होते.