Home Cities जळगाव पहूरमध्ये ‘समाधान शिबिर’ यशस्वी: ७०१ नागरिकांना थेट लाभ

पहूरमध्ये ‘समाधान शिबिर’ यशस्वी: ७०१ नागरिकांना थेट लाभ


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत बुधवारी पहूर महसूल मंडळाचे समाधान शिबिर चंदन मंगल कार्यालय, पहूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या शिबिरात २५ विभागांच्या ३८ स्टॉल्सद्वारे ७०१ नागरिकांना थेट लाभ देण्यात आला. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली.

या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला. संजय गांधी योजनेअंतर्गत तब्बल ५०७ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला, तर पी. एम. किसान योजनेच्या ७ लाभार्थ्यांनाही फायदा झाला. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ८२, पुरवठा शाखेतून ५८, आणि सेतू केंद्रांमार्फत ४५ लाभार्थ्यांना सेवा पुरवण्यात आल्या.

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी यावेळी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

या शिबिरामुळे नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्याने त्यांनी मोठे समाधान व्यक्त केले. अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पूर्वी महिनाभर लागणारी कामे एका दिवसात झाली,” तर काहींनी “वेळ आणि पैशांची बचत झाली,” असे म्हटले. शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून योजनांची अंमलबजावणी गतीमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरला, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound