सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन करत शिरपूर तालुक्यातील कु. साक्षी कुलकर्णी हिने राष्ट्रीय स्तरावर आपले नृत्यकौशल्य सिद्ध केले आहे. ‘थर्ड ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट 2025’ या प्रतिष्ठित स्पर्धेत सेमी क्लासिकल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून साक्षीने धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियममध्ये स्वरमयी नृत्य निकेतन, पुणे यांच्या तर्फे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मान्यतेने ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली. देशभरातील विविध राज्यांतील तब्बल 300 हून अधिक स्पर्धकांनी या भव्य नृत्यमहोत्सवात सहभाग घेतला होता. भरतनाट्यम, कथक, सेमी क्लासिकल आणि लोकगीत अशा विविध नृत्यप्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला होता.

या कठीण स्पर्धेत कु. साक्षी कुलकर्णी हिने आपल्या सादरीकरणाने परीक्षकांचे मन जिंकत सेमी क्लासिकल नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या नृत्यकौशल्यात लय, ताल आणि भावनांची उत्कृष्ट अभिव्यक्ती दिसून आली. तिच्या या यशामुळे शिरपूर आणि धुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. साक्षी ही सध्या आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.एस. शिरपूर येथे शिक्षण घेत आहे. तिला नूपूर कथक अकादमीच्या संचालिका तथा गुरु सौ. चारू भालेराव यांचे नृत्य प्रशिक्षण लाभले आहे. या स्पर्धेचे आयोजन स्वरमयी गोडबोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना साक्षीने नम्रपणे सांगितले की, “नृत्य ही केवळ कला नाही तर ती माझ्यासाठी साधना आहे. या यशाचे श्रेय माझ्या गुरूंच्या आणि पालकांच्या आशीर्वादाला जाते.” तिच्या या यशामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही शिरपूरचा गौरव वाढला आहे.
साक्षीच्या यशाने युवा कलावंतांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. नृत्यप्रेमी तरुणांना आपल्या मेहनतीने आणि निष्ठेने उच्च शिखर गाठता येते, हे साक्षीने सिद्ध करून दाखवले आहे.



