भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराजवळील साकेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी. तर्फे आयोजित ‘साकेगाव प्रीमियर लीग (एसपीएल) सीझन-२’ ला बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी झालेल्या रंगतदार सामन्यांमध्ये ९३ किंग्स, योद्धा आणि पूर्वा या संघांनी विजय मिळवत स्पर्धेत दमदार सलामी दिली. मैदानावर खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांची उसळलेली गर्दी आणि थेट प्रक्षेपणामुळे स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार नीता लबडे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, गटविकास अधिकारी दारासिंग जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांच्या हस्ते एसपीएलची प्रतिकृती हवेत सोडून व चेंडू टोलवून करण्यात आले. यावेळी गावातील सत्ताधारी व विरोधी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेट प्रक्षेपणामुळे साकेगाव प्रीमियर लीगला देशभरातून प्रतिसाद मिळत असून मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अमरावती, राजस्थान, गुजरात तसेच परदेशात असलेल्या गावकऱ्यांनीही सामन्यांचा आनंद घेतला. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारीही मैदानात उतरले आहेत. खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघमालकांनी पॉइंट्स टेबलनुसार संघात घेतल्याने स्पर्धेत आयपीएलसारखी रंगत पाहायला मिळत आहे.
पहिल्या सामन्यात ओम साई विरुद्ध ९३ किंग्स इलेव्हन असा सामना झाला. ९३ किंग्स संघाने अचूक फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर हा सामना १७ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात योद्धा विरुद्ध एम्पायर यांच्यात लढत रंगली. योद्धा संघाने आक्रमक खेळ करत २८ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात पूर्वा विरुद्ध वीर भगतसिंग संघ आमनेसामने आले. चुरशीच्या या लढतीत पूर्वा संघाने चार गडी राखून विजय मिळवत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.
स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून अंतिम सामना शनिवारी दुपारी खेळवण्यात येणार आहे. महामार्गालगत असलेल्या जि. प. शाळेच्या मैदानावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मैदानाच्या चारही बाजूंनी उभे राहून सामने पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींमुळे वातावरण भारावून गेले होते. अनेकांनी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कामावरून रजा घेतल्याचेही दिसून आले.
आयोजन समितीत जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, राहुल चौधरी, डॉ. दीपक पाटील, अजय चौधरी, रमजान पटेल, राहुल साळुंखे, डॉ. कैलास ठाकरे, पप्पू पटेल, भूषण सिंग राजपूत, प्रवीण पाटील, हेमंत वाघ, सचिन सोनवणे, मोहित दामोदर, निलेश कोळी आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या परिश्रमामुळे साकेगावमध्ये क्रीडामहोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. साकेगाव प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून गावकऱ्यांमध्ये क्रीडाप्रेमाची नवी उर्मी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



