यावल, प्रतिनिधी | येथील तालुक्यातील साकळीच्या सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था साकळी संचलित, श्री संत गजानन महाराज फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित साकळी ते शेगाव पदयात्रेचा शुभारंभ आज (दि.५) मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात झाला. सदर यात्रा गेल्या नऊ वर्षापासून आयोजित केली जात आहे.
सुरुवातीला मनवेल रोडवरील जोशीज् फार्मवरील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर पदयात्रेला सुरुवात होऊन तिचे साकळी गावात आगमन झाले. यात्रेदरम्यान संपूर्ण यात्रा मार्गावर शारदा विद्या मंदिर शाळेपासून ते नेवेवाणी गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. वारकरी संप्रदाय नुसार विविध अभंग गाऊन तसेच महाराजांचा जयघोष करून यात्रा मार्गस्थ होत होती. गावात यात्रेकरूंवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
पदयात्रेत शेकडो तरुण व मध्यम वयीन भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यादरम्यान हनुमान पेठेतील श्री हनुमान मंदिराजवळ श्याम महाजन मित्र परिवारातर्फे तसेच शिरसाड येथील सरपंच गोटू सोनवणे व मित्र परिवार- ग्रामस्थांतर्फे भाविकांना चहापाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच यावल येथेही घोडेपीरर बाबांच्या दर्ग्याजवळ सारंग बेहेडे यांनी चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती. रशीद बाबा आश्रमाचे गादीपती छोटू बाबा नेवे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच साकळी येथील ग्रामपंचायत सदस्य सै.अश्पाक सै.शौकत यांनीही ही यात्रेतील भाविकांचा सत्कार करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. गेल्या नऊ वर्षापासून या पायीवारीचे आयोजन होत आहे. एकूणच साकळी ते शेगाव यात्रेला भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहता ही पदयात्रा गावाचा धार्मिक वारसा बनली आहे. साकळी गावातून जाणाऱ्या यात्रा मार्गात ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता करून सहकार्य केले.