जळगाव (प्रतिनिधी) लग्नाहून परतणारे दोन मित्र दुचाकीने घरी जात असतांना मंगळवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला बँण्ड पथकाच्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू होवून दुसरा गंभीर जखमी होता. जखमीस खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा येथील महेंद्र शिवलाल पाटील (वय-३२) आणि सागर प्रकाश पाटील (वय १९) हे दोघे दुचाकीने वावडदा येथे येथे मंगळवारी संध्याकाळी ७.०० वाजता गोरज मुहूर्तावरील लग्न आटोपून दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, एके-२६८१) कुसुंब्याकडे जात असतांना रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉनजवळ समोरून बॅण्ड पथकाच्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील महेंद्र पाटील याचा जागीच मृत्यू झाला होता तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला होता. परीसरातील नागरिकांनी जखमीस तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सागरचाही मृत्यू झाला. मयत सागरच्या मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला. सागर गेल्या दोन वर्षांपासून सुप्रीम कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात दोन मोठे विवाहित भाऊ, विवाहित बहिण व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.