Home आंतरराष्ट्रीय वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्समध्ये नीरज-नदीमवर सचिन यादव भारी; पदक हुकलं पण कामगिरीनं सर्वांची मने...

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्समध्ये नीरज-नदीमवर सचिन यादव भारी; पदक हुकलं पण कामगिरीनं सर्वांची मने जिंकली

0
315

टोकियो-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा।  जपानच्या टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू सचिन यादव याने आपली दमदार छाप सोडली. देशाचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम यांच्यासह रंगलेल्या या स्पर्धेतील स्पर्धा अधिकच चुरशीची झाली. मात्र, अपेक्षेपेक्षा वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली. नीरज आणि नदीम या दोघांचीही कामगिरी सामान्य ठरली, तर भारताचा नवोदित खेळाडू सचिन यादव मैदानात आपली छाप सोडत चौथ्या क्रमांकावर झळकला.

या स्पर्धेपूर्वी सर्वांचे लक्ष नीरज चोप्रावर होते, कारण तो गतवर्षीचा चॅम्पियन होता आणि त्याच्याच जोरावर भारताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भालाफेकीत यश मिळवले होते. दुसरीकडे, पाकिस्तानचा अर्शद नदीम देखील ऑलिम्पिक पदक विजेता असल्यामुळे ही लढत नीरज विरुद्ध नदीम अशी रंगणार, असे सर्वांना वाटले. मात्र, मैदानात चित्र काहीसं वेगळंच दिसून आलं. नीरज चोप्राने सातत्याने ८५ मीटरच्या आसपास भाला फेकला, पण या स्पर्धेत त्याची सर्वोच्च थ्रो ८४.०३ मीटर इतकी होती आणि त्यामुळे तो आठव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. अर्शद नदीम याला तर केवळ ८२.७५ मीटर थ्रो करता आला आणि त्याला १० वा क्रमांक मिळाला.

या दोन्ही स्टार खेळाडूंना मागे टाकत भारताचा सचिन यादव मात्र सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरला. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या दोन प्रयत्नातच ८६.२७ मीटरचा भालाफेक करत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. याआधी कोरियामधील आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने ८५.१६ मीटर थ्रो करत आपली ताकद दाखवून दिली होती. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने त्याहून अधिक सुधारणा करत देशवासीयांची मने जिंकली.

या स्पर्धेत त्रिनिडाड अ‍ॅण्ड टोबॅगोच्या केशोर्न वॉलकॉट याने ८८.१६ मीटर थ्रोसह सुवर्ण पदकावर कब्जा केला. ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्स याने ८७.३८ मीटर थ्रोसह रौप्य पदक जिंकलं, तर अमेरिकेच्या कर्टीस थॉम्पसन याने ८६.६७ मीटर भालाफेक करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. सचिन यादव केवळ ०.४० मीटरने कांस्य पदक हुकवून चौथ्या स्थानावर राहिला, पण त्याची झंझावाती कामगिरी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.

नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना मागे टाकत सचिन यादवने केवळ पदकाच्या शर्यतीत आपली छाप उमटवली नाही, तर भारताच्या भालाफेकीतील भविष्यासाठी एक नवा आशावाद जागवला आहे. त्याची ही कामगिरी सांगते की, पुढच्या स्पर्धांमध्ये तो नक्कीच देशासाठी पदक जिंकल्याशिवाय राहणार नाही.


Protected Content

Play sound