धक्कादायक : सचिन तेंडुलकर इतर दिग्गजांचे पँडोरा पेपर्समध्ये नाव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | जगभरातील मातब्बर राजकारणी, धनाढ्य उद्योगपती आणि सेलिब्रीटीजनी कर चोरी करण्यासाठी काही देशांमध्ये अवैध गुप्त गुंतवणूक केल्याची माहिती पँडोरा पेपर्स लीकमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी व कॉंग्रेसचे नेते सतीश शर्मा आदींची नावे आहेत.

इंटरनॅशनल कन्सोर्टीयम ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालिस्ट या जगविख्यात संस्थेने पँडोरा पेपर्स या नावाने करचोरी करून अवैध पध्दतीत गुंतवणुकीता गौप्यस्फोट ताज्या लीकमधून केलेला आहे. यात तब्बल १ कोटी २० लाख डॉक्टुमेंटचा समावेश असून हा एकत्रीत डेटा सुमारे २.९४ टेराबाईट इतका आहे. यात जगभरातील मातब्बर राजकारण्यांसह सेलिब्रिटीजचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, कॉंग्रेसचे दिवंगत नेते सतीश शर्मा आणि कार्पोरेटी लॉबीस्ट नीरा राडिया यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी करमाफी वा कर सवलत असणार्‍या देशांमध्ये गुप्त गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे.

पँडोराा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातील अल्कोगाल या लॉ फर्ममधील तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची बीव्हीआयमधील सास इंटरनॅशनल लि. या कंपनीचे बीओ व संचालक म्हणून नावे आहेत. कंपनीच्या अवसायनाच्या वेळी तिचे समभाग नोंदणीकृत किमतीसह समभागधारकांनी खालीलप्रमाणे पुन्हा खरेदी (बायबॅक) केले होते. यात सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासू सासर्‍यांकडील ९० समभागांची किंमत ८.४६ दशलक्ष पौंड (सुमारे ६० कोटी रुपये) इतकी असावी, असा अंदाज आहे. याबाबतची माहिती सचिनने राज्यसभा सदस्य म्हणून जाहीर केली नव्हती हे विशेष.

यासोबत, जगभरातील कुठल्याही कंपनीत आपली मालमत्ता किंवा उल्लेखनीय आर्थिक हितसंबंध नाहीत, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सांगितले होते. तथापि, रिलायन्सचे एडीए समूहाचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या मालकीच्या किमान १८ परदेशी कंपन्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स व सायप्रस येथे असल्याचे पँडोरा पेपर्सच्या रेकॉर्डसमध्ये उघड झाले आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांच्या परदेशात कंपन्या व मालमत्ता होत्या, असे पँडोरा पेपर्समध्ये दिसून आले आहे. तसेच या यादीत नीरा राडिया या कार्पोरेटी लॉबींग करणार्‍यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबत अभिनेता जॅकी श्रॉफ, ख्यातनाम महिला उद्योजिका किरण मुजूमदार शॉ, विनोद अडाणी आदींची नावे देखील यात असल्याचे अधोरेखील झाले असून यामुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content