मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना राणावत हिचे समर्थन करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांवरही अविश्वास व्यक्त करतांना मुंबईत पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटत असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. यावर भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याच राम कदमांना आता काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, म्हणजे कंगना+भाजप आयटी सेल कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आपल्या मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्ज विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, ही आमची मागणी असल्याचे सचिन सावंत यांनी नमूद केले आहे.