जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या विविध योजनांचा राज्याचे ग्रामविकास, पर्यटन व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीष ठाकूर, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, अभियंता दीपक झा, अधीक्षक हर्षल वाणी, संगणक अभियंता गोपाल तायडे, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त विविध निधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, नगरोत्थोन योजना, दलित वस्ती, दलित्तेर वस्ती, नगरपालिकाकडील विविध योजना, सर्व प्रकारच्या आवास योजनांची प्रगती, पीएमए योजना, जिल्ह्यातील इतर प्रलंबित विषयाबाबत 19 नगरपालिका व 1 महानगरपालिकेचे यावेळी सादरीकरण झाले. नगरपालिकांमधील अनुकंपा भरतीचा ही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला व दुसरा हप्ता, प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. नव्याने स्थापन नगरपंचायतीना नागरी सुविधांची कामे यामध्ये बोदवड व मुक्ताईनगर मधील कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन निधी अंतर्गत राज्य नगरोत्थान योजना,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजना, अग्नीशमन सेवा बळकटीकरण योजनांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महा स्वच्छता अभियान कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन म्हणाले की , जिल्ह्यात नगरपालिकांचे ११६७ कामांपैकी ३२७ कामे सुरू आहेत. कामांना गती देण्याची गरज आहे. आचारसंहिता पूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांनी त्यांच्या तालुक्यातील नगरपालिकांच्या कामांचा आढावा घ्यावा. शहरातील स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून स्वच्छतेकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. मुक्ताईनगर मधील बायोमेडिकल वेस्टचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावावा.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी शासकीय महाविद्यालयाच्या कामांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटी मंजूर आहेत. १९ में २०१९ रोजी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली. बांधकाम प्रगतीपथावर असून ३५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी १७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती गिरिष ठाकूर यांनी यावेळी दिली.
यावेळी जळगाव विमानतळाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पुढील महिन्यापर्यंत विमान फेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.