नवीदिल्ली, वृत्तसंस्था | ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याविरोधात हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२२) रामलीला मैदानावरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत शिकले-सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत असून या देशातील मुस्लिमांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवले जाईल, असे खोटे पसरवण्यात येत आहे असे सांगत देशाला उद्धस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.
देशात कुठेही डिटेंशन कॅम्प अस्तित्वात नसून देशातील कोणत्याही मुस्लिमाला नसलेल्या कॅम्पमध्ये पाठवले जाणार, ही निव्वळ अफवा आहे. नागरिकता कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंध नसून पूर्वीच भारतात आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. हे काँग्रेसचे लोक आणि अर्बन नक्षली जे काही सांगत आहेत, ते सर्व ‘खोटे आहे, खोटे आहे, खोटे आहे’ असे त्रिवार सांगत मोदींनी हा कायदा वाचून पाहण्याचे आवाहन केले.
‘दलित नेत्यांचा विरोधही चुकीचाच’
दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांवर तुटून पडलेले पंतप्रधान मोदी यांनी देशातील दलित नेत्यांच्या भूमिकेवरही टीकास्त्र सोडले. मोदी म्हणाले की, ‘हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे, याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेतेही या वादात पडले आहेत. ज्यांच्यावर शेजारी देशांमध्ये धार्मिक अत्याचार झाले अशांना संरक्षण देणारा हा कायदा आहे. पाकिस्तानातून आलेले शरणार्थी हे अधिकतर दलित समाजाचे आहेत. आजही पाकिस्तानात दलितांना गुलामीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांना चहाही कपासह विकत घ्यावा लागतो. त्यांच्या मुलींवर अत्याचार होतात. त्यांच्याशी बळजबरीने लग्न केले जाते आणि बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले जाते.’
भारतातील मुस्लिमांचा या कायद्याशी काहीही संबंध नाही. भारतातील कोणत्याही नागरिकाचा या कायद्याशी संबंध नाही. मुस्लिमांना कुठेही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाणार नाही. भारतात असे डिंटेशन केंद्र अस्तित्वात नाही, असे म्हणत हे लोक खोटे बोलण्यासाठी कोणत्याही थराला जातील, अशी टीकाही मोदी यांनी केली. हा कायदा केवळ जुन्या शरणार्थींसाठी असून याचा नव्या शरणार्थींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
मोदीचे पुतळे जाळा, पण गरिबांची झोपडी, रिक्षा जाळू नका
या वेळी बोलताना मोदी यांनी हिंसाचार करणाऱ्यांवरही टीका केली. तुमच्या मनात जेवढा राग आहे, तेवढा मोदींवर काढा, मोदींना जेवढ्या शिव्या द्यायच्या असतील, तेवढ्या द्या. मोदींचे पुतळे जाळायचे असतील तर तेही जाळा, पण गरिबांना त्रास देऊ नका, गरिबांच्या ऑटोरिक्षा जाळू नका, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.