गोगडी धरण फुटल्याची अफवा ; सांगवी ग्रामस्थांनी सोडले गाव (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 03 at 5.01.34 PM

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी  | पहूर येथून जवळच असलेले गोगडी धरण फुटल्याच्या अफवेने जामनेर तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गाव सोडल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला.

यावर्षी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोगडी धरण हे १०० टक्के भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोगडी नदिलाही मोठा पूर आला आहे. गोगडी नदीला आलेला एवढा मोठा पूर पाहून नागरिक भयभीत झाले. तसेच नदीवर असलेले गोगडी धरण फुटल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी गाव सोडून पहूर येथे आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला. दरम्यान, गेल्या वीस दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या परतीच्या पावसाच्या तडाख्याने संपूर्ण पहूरसह, सांगवी व परिसरातील शेतकऱ्यांना झोडपले आहे. या परतीच्या पावसाचा ज्वारी, मका, कापूस, या पिकांना जोरदार फटका बसला आहे. तसेच सांगवी शिवारातील गोगडी नदिच्या काठावर असलेल्या अमोल सुधाकर घोंगडे व जवळच असलेल्या विलास चिंधूबा लहासे या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपुर्वी आपल्या शेतात मातीचा भराव टाकला होता. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे गोगडी नदिलाही प्रचंड पूर आल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह शेतातील संपूर्ण माती वाहून गेल्याने शेताचे नदी पात्रात रूपांतर झाले आहे. या पावसात पहूरसह सांगवी शिवारातील असंख्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंत्री तसेच संबंधित अधिकारी यांनी नुसत्या नुकसानीची पाहणी न करता शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आलेल्या या भिषण संकटावर मात करण्यासाठी त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पूल ही गेला वाहून

पहूर येथून सांगवी याठिकाणी जाण्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी गोगडी नदिवर बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव ही मुसळधार पावसामुळे व गोगडी  नदीलाही  आलेल्या प्रचंड पुराने वाहून गेल्याने ग्रामस्थांना जाण्या-येण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Protected Content