Home क्राईम जिल्हा रुग्णालयात राडा! उपचार घेणाऱ्या दोन गटांची पुन्हा हाणामारी; तोडफोड

जिल्हा रुग्णालयात राडा! उपचार घेणाऱ्या दोन गटांची पुन्हा हाणामारी; तोडफोड


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भांडण झाल्यानंतर दोन्ही गटातील जखमी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी ते पुन्हा समोरासमोर आल्याने त्यांच्यात पुन्हा वाद होवून हाणामारी झाली. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. दरम्यान, त्यांना पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांनी देखील शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावात काही तरुणांमध्ये भांडण झाल्यामुळे ते जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयातील वार्ड क्रमांक एक मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले आणि त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी त्यांनी रुग्णालयात एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याठिकाणी गोंधळ वाढत असल्याने तेथील सुरक्षा रक्षकांनी धाव घेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याठिकाणी नियुक्त असलेले डॉक्टरांकडून या घटनेचा व्हिडीओ काढला जात होता, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल हिसकावून आमचा व्हिडीओ काढता असे म्हणत त्यांना देखील अश्लिल शिवीगाळ केल्याचे व्हीडीओमध्ये कैद झाले आहे.

दोन्ही गटातील वाद वाढतच असल्यामुळे त्याठिकाणी ड्युटीवर असलेले जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी देखील मध्यस्ती करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडूनच पोलिसांसह डॉक्टरांना शिवीगाळ केली जात होती. तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान पोलिसांसह डॉक्टरांना शिवीगाळ होत असल्यामुळे पोलिसांनी भांडण करणाऱ्यांपैकी राकेश प्रकाश पाटील (वय २८, आहुजानगर), गौरव किशोर बागुल (वय २८, रा. आंबेडकरनगर) व गणेश शांताराम इंगळे (वय २८, रा. आंबेडकरनगर) या तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तोडफोड करीत गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांनी ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रार देण्यास सांगितले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार देवू असे म्हणत तक्रार देण्यास नकार देत, ताब्यात असलेल्यांना सोडून देण्याबाबत सांगितले.


Protected Content

Play sound