नवी दिल्ली: वृत्तसंस्था । सुप्रीम कोर्टाने कोरोनाच्या RTPCR चाचणीचे दर ठरवण्यासाठी केंद्र, राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस जारी केली आहे. देशात होत असलेल्या RTPCR चाचणीचा दर ४०० रुपये इतका करण्यात यावा, अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.
यामुळे चाचण्यांमध्ये वाढ होऊन लोकांना त्याचा लाभ होईल, असे याचिकेत म्हटले आहे. ही याचिका वकील अजय अग्रवाल यांनी दाखल केली आहे. देशात RTPCR चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. संपूर्ण देशात करोनाच्या RTPCR चाचणीचे दर समान ठेवणे आवश्यक आहे, असे अग्रवाल यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटले. त्यावर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून दोन आठवड्यांमध्ये उत्तर मागितले आहे.
दिल्ली येथे वाढता संसर्ग पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी RTPCR मोबाइल टेस्टिंग लॅब सुरू केली होती. चाचणीसाठी आयसीएमआरने देशात स्पाइस जेटच्या स्पाइस हेल्थसोहत खासगी भागीदारी करत ही लॅब सुरू केली होती.
संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या भागांमध्ये व्हॅन नेऊन तेथेच लोकांच्या चाचण्या करण्याचा RTPCR मोबाइल टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आता चाचणी ५०० रुपयांमध्ये करता येते. या चाचण्यांचे रिपोर्ट देखील त्याच दिवशी लोकांना प्राप्त होतात.