अयोध्या, वृत्तसंस्था | उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी गुरूवारी (दि.१४) अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली आहे. रिझवी यांनी सांगतिले की, बोर्ड मंदिर उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक आहे. अनेक दशकं चाललेल्या या खटल्यावर अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. आता भारतात रामजन्मभूमीवर जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचे कार्य सुरू होत आहे.
रिझवी म्हणाले की, भगवान राम आपल्या सर्वांचेच पूर्वज आहेत, म्हणूनच रिझवी फिल्मच्यावतीने ५१ हजार रूपयांची भेट रामजन्मभूमी न्यासकडे मंदिर उभारणीसाठी देत आहोत. भविष्यात राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर शिया वक्फ बोर्डाच्यावतीने त्यातही मदत केली जाईल, अयोध्येतील राम मंदिर संपूर्ण जगभरासह भारतातील राम भक्तांसाठी गर्वाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे, तर मशीद बांधण्यासाठी वेगळी पाच एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या.ए.अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला. तीन महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.