बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी आयुष्यभराची जमवाजमव करून आणलेले पाच लाख रुपये चोरीस गेल्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, चोरट्यांना कर्नाटकातून अटक करत संपूर्ण रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही धक्कादायक घटना मेहेकर येथून बुलढाण्यात घडली होती. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी संबंधित वडील घरून ५ लाख रुपये घेऊन बुलढाण्यात आले होते. मात्र मेहेकर येथूनच दोन चोरट्यांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांचा पाठलाग सुरू केला. बुलढाण्यात राजश्री शाहू विद्यालयासमोर कार उभी असताना चोरट्यांनी संधी साधत कारची काच फोडली आणि आत ठेवलेली संपूर्ण रक्कम चोरून पळ काढला.

या प्रकरणी ९ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासाचे आदेश दिले. नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न असल्याने हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यावर भर देण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी बुलढाणा जिल्हा सोडून कर्नाटक राज्यात पळून गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने कर्नाटकात जाऊन सापळा रचत दोन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली संपूर्ण ५ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न भंग पावणार की काय, या भीतीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी रोख रक्कम वाहतूक करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



