जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याने जळगावच्या विकासासाठी १५ कोटी रूपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली असून यातून रस्त्यांसह अन्य कामे मार्गी लागणार आहेत.
आमदार राजूमामा भोळे यांनी पावसाळी अधिवेशनच्या जळगाव शहराच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता शहराच्या विकासासाठी अजून १५ कोटी रूपयांचा निदी मिळाला आहे. यात आधीच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चित्रा चौक दरम्यानच्या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर आज पुन्हा १० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.
या १० कोटी रूपयांमधून रस्ते आणि गटारींसाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. स्मशानभूमीतील विविध कामांसाठी ७५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत. यातून नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहराच्या विस्तारीत भागातील पथदिव्यांसाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आलेली असून उर्वरित दीड कोटी रूपयांमध्ये शहरात आबालवृध्दांसाठी बगिच्याची निर्मिती करण्यात येणार आहे. अर्थात, या १५ कोटींच्या निधीपैकी १२ कोटींचा निधी रस्त्यांसाठी तर उर्वरीत कामांना तीन कोटी रूपयांची तजवीज करण्यात आलेली आहे.
दरम्यान, या संदर्भात आमदार राजूमामा भोळे लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना म्हणाले की, शहरातील विविध विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू असून यातून भरीव कामे मार्गी लागत आहेत. उर्वरित कामांसाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू असून यातून लवकरच अन्य कामांचा देखील मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली.