Home क्रीडा रोहित शर्माचा नवा विश्वविक्रम ; वनडे क्रिकेटचा ‘सिक्सर किंग’ बनत मोडला आफ्रिदीचा...

रोहित शर्माचा नवा विश्वविक्रम ; वनडे क्रिकेटचा ‘सिक्सर किंग’ बनत मोडला आफ्रिदीचा विक्रम


रांची-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । रांची येथील वनडे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीची आतषबाजी करत क्रिकेटविश्वाला दाद द्यायला लावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही लढत रोहितच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे विशेष ठरली. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा जागतिक विक्रम मोडून रोहितनं वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा मान पटकावत ‘सिक्सर किंग’ म्हणून आपलं नाव भल्याभल्यांपुढे कोरलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना रोहितच्या बॅट मधून ३ षटकारांची आतषबाजी झाली आणि त्याच क्षणी आफ्रिदीचा ३५२ षटकारांचा विक्रम मागे पडला. आपल्या ३५२* षटकारांसह रोहित आता यादीच्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी हा मान पाकिस्तानचा स्फोटक अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या नावे होता. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आपल्या ३३१ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर असून भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी २२९ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

रोहितनं या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक झळकावत फॉर्मची चुणूक दाखवली. मार्को यान्सेनच्या चेंडूवर पायचित होऊन त्याचा डाव खंडित झाला, मात्र त्यापूर्वी ५१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करून त्यानं भारतीय संघाची भक्कम पायाभरणी केली. या डावातील तीन षटकारांनीच त्याची ‘सिक्सर किंग’ पदवी अधिकृत झाली.

भारतीय डावाला सुरुवात करताना रोहितनं यशस्वी जैस्वालच्या साथीने धावांची सुरुवात छान केली. जैस्वाल २५ धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात विराट कोहली येताच सामन्याचे चित्र बदलले. रोहित-विराट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०९ चेंडूत १३६ धावांची दमदार भागीदारी केली. या दोघांच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच कोंडीत पकडत प्रेक्षकांना जोरदार क्रिकेटची मेजवानी दिली.

या सामन्यातील रोहितची विक्रमी कामगिरी आणि विराटसोबतची अभेद्य भागीदारी यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे. जागतिक स्तरावर भारतीय फलंदाजांची प्रभुत्वशाली ताकद पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्याची चर्चा क्रिकेटरसिकांमध्ये रंगली आहे.


Protected Content

Play sound