
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून हा पुरस्कार देण्यात येतो.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ७ मार्च रोजी आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांच्या वतीने त्यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटरचे संचालक रितेश निकम यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याला निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील, महापौर हिमगौरी आडके-आहिर, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक, संतोष मराठे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.
राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांच्या वतीने रितेश निकम यांनी पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



