जळगाव प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आज निशाणा साधला आहे.
सध्या ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये ओबीसीच उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात दिनांक २६ जून रोजी आंदोलन देखील करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर, आज जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.” या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच थेट फडणवीस यांना टार्गेट केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
दरम्यान, रोहिणीताई खडसे यांनी फडणवीस यांना टार्गेट केले असतांना कालच खासदार रक्षाताई खडसे यांनी ओबीसी आरक्षणासाठी भाजप आंदोलन करणार असून आपण यात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणावरून खडसे कुटुंबातील दोन भूमिका समोर आल्या आहेत.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021