मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचे संकेत दिले असतांनाच त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांनी मात्र आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज आमदार एकनाथराव खडसे यांनी स्पष्टपणे आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. लवकरच ते घरवापसी करणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. त्यांच्या सोबत त्यांची कन्या रोहिणीताई खडसे आणि अन्य समर्थक देखील भाजपमध्ये येतील असे मानले जात होते. मात्र रोहिणीताईंनी वेगळीच घोषणा केली आहे.
आज रोहिणीताई खडसे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण शरद पवार गटासोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी तुतारी फुंकत असल्याचा फोटो देखील पोस्ट केला आहे. यात त्यांनी स्पष्टपणे आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात आम्ही रोहिणीताई खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. तथापि, आपण सोमवारी शरद पवार साहेबांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
रोहिणीताई खडसे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांनी आपले वडिल आमदार एकनाथराव खडसे यांच्या थेट विरूध्द भूमिका घेत पक्षातच राहण्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर मुक्ताईनगरातून उभे राहिल्यावर आपल्याला भाजपमधून तिकिट मिळणे अवघड असल्याचे त्यांनी जाणून घेतले असावे. यातूनच त्यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला असावा असे मानले जात आहे.