नाशिक (वृत्तसंस्था) शहरातील उंटवाडी भागातील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात आज सकाळी सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. या कार्यालयात लूटमार करतानाच दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यात कार्यालयातील एक कर्मचारी ठार झाला असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. भरदिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी सहा दरोडेखोरांनी मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यातील दोन दरोडेखोरांच्या चेहऱ्याला मास्क लावले होते. चौघांच्या हातात पिस्तुल आणि दोघांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. या दरोडेखोरांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली असता सजू सॅम्युअल यांनी त्याला विरोध करताच एका दरोडेखोराने यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कार्यालयातील एकाच्या डोक्यावर लोखंडी पिस्तुलाने प्रहार करत व्यवस्थापकालाही मारहाण केली. या हल्ल्यात चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन गोळ्या लागलेल्या सॅम्युअल यांचा मृत्यू झाला आहे.
दरोडेखोरांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असतानाच सुरक्षा रक्षकाने सायरन वाजविल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करत तिथून पलायन केले. या दरोडेखोरांच्या हाती काहीही लागले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक याप्रकरणी कसून तपास करत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी धुडगूस घातल्याने नाशिक शहर हादरले आहे.