एलईडी पथदिव्यांनी उजळणार जळगावचे रस्ते !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता एलईडी पथदिवे लावण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ आता करण्यात आला आहे.

जळगाव शहरात १५ हजार ४५७ एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवर्षी ३२.६ लाख युनिट विजेची बचत होणार आहे. नेहरू चौकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत एलईडी पथदिवे बसविण्यात आले असून याच्या माध्यमातून या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे, सभापती मंगला चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, कैलास सोनवणे यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

एनर्जी इफिसियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतर या निधीतील १० कोटींतून एलईडी पथदिवे बसवण्याचा विचार मांडला होता. यानुसार हे पथदिवे लावण्यात येत आहेत. येत्या दोन महिन्यात एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. पथदिव्यांसाठी सध्या ५७.४ लाख युनिट विजेचा वापर होत असून ३.४४ कोटी रुपये वीजबिलांवर खर्च होत आहेत. एलईडी पथदिवे बसवल्यानंतर एक वर्षाचा विजेचा वापर २४.८ लाख युनिट होईल. त्यासाठी केवळ १.४८ कोटीे खर्च होणार आहे. त्यामुळे ३२.६ लाख युनिट वीज बचत होऊन १.९५ कोटी रुपये वाचणार आहेत. रस्त्याची रुंदी, खांबाची उंची व दोन खांबामधील अंतर विचारात घेऊन १८, ३५, ७० व ११० व्हॅटचे एलईडी बसविण्यात येत आहेत.

Add Comment

Protected Content