नेहरू युवा केंद्रातर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव आणि के.बी.सी. यू.एम. व्ही. जळगावच्या सामाजिक विज्ञान विभागाने संयुक्तरित्या २१ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम आयोजित केली. “मेरा युवा भारत” उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या या मोहिमेचा उद्देश रस्ता सुरक्षेबाबत तरुणांमध्ये आणि समाजात जागृती निर्माण करणे हा होता.

२१ जानेवारीला या मोहिमेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी, संचालक अजय पाटील, डॉ. सचिन नांद्रे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. खासदार वाघ यांनी उपस्थित तरुणांसमवेत रस्ता सुरक्षा शपथ घेतली आणि रस्ते अपघातांची आकडेवारी, त्यांची कारणे आणि टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी हेल्मेट आणि सीट बेल्टच्या नियमित वापराचे महत्त्व पटवून दिले आणि अपघातप्रवण रस्त्यांवर सावधगिरीने प्रवास करण्याचा सल्ला दिला. कुलगुरू माहेश्वरी यांनी रस्ता सुरक्षेशी संबंधित अनुभव सांगत, शाळा आणि महाविद्यालयांत रस्ता सुरक्षेबाबत अभ्यासक्रम तयार करण्याची गरज व्यक्त केली.

या मोहिमेचा मुख्य भाग म्हणजे २५ MYBharat स्वयंसेवकांना वाहतूक पोलिसांच्या सोबत २ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. २२ आणि २३ जानेवारी रोजी या स्वयंसेवकांना कोर्ट चौक आणि टॉवर चौक येथे तैनात करण्यात आले. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने लोकांमध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याबाबत जनजागृती केली. या प्रयत्नांमुळे नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत अधिक जागरूक होण्याची संधी मिळाली.

स्वयंसेवकांनी जळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच जुन्या व नवीन बसस्थानकांवर पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. या नाट्यांमधून वाहतूक नियमांचे महत्त्व, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, आणि वाहतुकीशी संबंधित अन्य मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या उपक्रमात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्वयंसेवकांना वाहतूक नियंत्रणाची प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी दिली. याशिवाय, त्यांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात उपस्थित तरुणांच्या शंकांचे निरसन केले आणि नियमांचे पालन करण्यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक वर्षा पालखी यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश माळी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उमेश गोगडिया, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. विजय घोरपडे, डॉ. समाधान बनसोडे, डॉ. अभय मानसरे, आणि इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Protected Content