जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगावात १० मार्च रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे पूर्वपरवानगी मागण्यात आली असून आकाशवाणी चौक, नॅशनल हायवे येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सुमारे ५० समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
सौ. मंगलाताई महेश सोनवणे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या अर्जामध्ये ही माहिती दिली आहे. ‘क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी संघर्ष समिती’च्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यातआले होते. समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीत बंजारा संवर्गासह संबंधित समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीची नोंद घेण्यात आली होती. या मागणीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ तसेच उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली आहे. मात्र या समितीच्या स्थापनेला आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, आदिवासी यादीमध्ये क्रमांक २८, २९ व ३० वर त्यांचा समाज समाविष्ट असूनही त्यांच्या मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्गाला आदिवासी यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. जोपर्यंत त्यांच्या समाजाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही वर्गाला आदिवासी यादीत सहभागी करून घेण्यास विरोध राहील, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. १० मार्च रोजी आकाशवाणी चौक, नॅशनल हायवे येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ५० समाज बांधवांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनाचे मुख्य आयोजक म्हणून मंगलाताई सोनवणे, चैताली पाटील, सुनंदा कोळी, प्रतिभा कोळी, संगिता कोळी, आशा सोनवणे, भिलाभाऊ सोनवणे, राज साहेबराव पाटील, नाना शामराव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश कोळी आदींची नावे पुढे आली आहेत. या सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह पोलीस प्रशासनाकडे आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे.



