जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे मोबाईल घेण्याच्या झालेल्या वादातून रिक्षा चालकाला तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ३ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, अनिल अशोक निकम (वय-४१) रा. धनगरवाडा कंडारी ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियासह राहतात. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अनिल निकम यांचा मुलगा अकित निकम हा बादल परदेशी यांच्याकडे मोबाईल फोन परत मागण्यासाठी घरी गेला. याचा राग आल्याने बादलने अनिलच्या डोक्यात विट मारून फेकली. त्यात त्यांना चक्कर आले. अकित व त्याचा भाऊ अश्विन यांनी वडीलांना मारल्याचा जाब विचारला असता बादल परदेशी आणि आकाश परदेशी यांनी घरातून कुऱ्हाड व तिक्ष्ण हत्यार आणून दोघांवर वार करून जखमी केले. याप्रकरणी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून बादल लक्ष्मण परदेशी, आकाश लक्ष्मण परदेशी, लक्ष्मण राजाराम परदेशी, कुसुम लक्ष्मण परदेशी आणि जया हर्षल परदेशी सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव यांच्याविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.