धरणगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित बेमुदत शालेय कामकाज बंद आंदोलनास उत्स्फुर्तपणे पाठिंबा देत धरणगाव शहरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्यास प्रामाणिकपणे मनपुर्वक अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शासनाने तात्काळ १००% पगार सुरु करण्यात यावा म्हणून धरणगाव निवासी नायब तहसीलदार तसेच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर अधिकारी व महाविद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
राज्यातील सर्व विनाअनुदानित तत्त्वावर कार्य करणारे उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षकांच्या वेतन व अनुदान संबंधीच्या मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असल्याने शिक्षकांनी संप पुकारलेला आहे. इ.११ वी व १२ वी चे वर्ष जीवनाला कलाटणी देणारे असुन आमचे शैक्षणिक दिवस वाया जात आहे. तरी गेल्या १७ ते १८ वर्षांपासून विना वेतन आपली निष्काम सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,यांनी ठोस सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागावा .आम्ही सर्व विद्यार्थी या विनाअनुदानित संस्थामधून ग्रामीण भागात शिक्षण घेत आहोत. आमच्या शिक्षकांना अनेक वर्षांपासून पगार नसल्याने उच्चशिक्षीत शिक्षकांना वेठबिगारीचे जीवन जगावे लागत आहे.ही बाब पुरोगामी तसेच प्रगतशील महाराष्ट्रास अशोभनीय आहे.तरी शासनाने १४ ऑगस्टपर्यंत आमच्या शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा न काढल्यास शासनाच्या उदासिन तसेच अन्यायकारक धोरणाविरोधात आम्हा विद्यार्थ्यांवर नाईलाजास्तव रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल असा इशारा विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर ३०० विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. तसेच यावेळी विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीनेही दि.९ ऑगस्ट पासुन बेमुदत काम बंदचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व विद्यलयाच्या प्राचार्या यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनाअनुदानित शिक्षक संघनटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. आर .एस. मराठे, प्रा. एस. ए. शिरसाठ, प्रा. एस. एम. देशमुख,प्रा. ए. एस. सुर्यवंशी, प्रा.डी. बी.बोरसे,प्रा.श्रीमती के.एन.पाटील,प्रा.श्रीमती ए.एम.गावित आदी उपस्थित होते.