Home Cities जळगाव दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील दिव्यांग कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दिव्यांग समितीच्या बैठकीत विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांमधील समन्वय वाढवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

जि.प. सेस २०२५-२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमधील ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी सुमारे ५३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.

बैठकीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला तसेच येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. यासोबतच यूडीआयडी कार्ड वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित अर्जांची संख्या आणि त्यांची जलद निकाली काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही विचारविनिमय करण्यात आला. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यूडीआयडी प्रमाणपत्र पडताळणीची स्थितीही तपासण्यात आली.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीच्या वापराचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ टक्के निधी, विविध विकासकामे, मर्यादित व कायदेशीर पालकत्व प्रकरणे तसेच शासकीय इमारतींमध्ये सुगम्यता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

समावेशक आणि सशक्त समाज निर्मितीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


Protected Content

Play sound