जळगाव (प्रतिनिधी) मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने प्रलंबित १९ मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात शुकशुकाट पसरलेला आहे.
अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी आज जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील तब्बल 20 हजार महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सरकारची कोंडी झाली आहे.