
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाचा खरा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय. एखाद्या शेतकऱ्याची जमीनविषयक अडचण दूर होणे, विद्यार्थ्याला आवश्यक दाखला मिळणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळणे या क्षणांमधून लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच शासनाच्या कार्याचे खरे यश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ प्रसंगी ते बोलत होते.

धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शनिवारी सकाळी भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला. या शिबिराच्या माध्यमातून महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य आणि इतर विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही आणि गावपातळीवरच अनेक समस्या सोडवण्यात आल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचा उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. शासन शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असून अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागून शासनाच्या योजना प्रत्येक पात्र घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी साध्या कागदपत्रांसाठीही नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट गावपातळीवर आणण्याचा निर्णय शासनाने घेतला असून “शासन जनतेच्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षांत या अभियानामुळे हजारो नागरिकांना सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, सामाजिक सुरक्षा योजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी हे अभियान सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महसूल समाधान शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. जात प्रमाणपत्र १४४, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ११८, नवीन रेशन कार्ड २७, संजय गांधी योजना मंजूर प्रकरणे २८, वारस फेरफार ४२, कालबाह्य नोंदी कमी करणे ६३०, आयुष्मान भारत कार्ड ९ आणि घरकुल लाभार्थी नमुना ८ चे १८ प्रकरणे यांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागामार्फत कांदा चाळ पूर्वसंमती २, पॅक हाऊस पूर्वसंमती १ आणि शेततळे पूर्वसंमती १ मंजूर करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत आठ गावांतील एकूण २८४० ड्रोन सर्वे सनदांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांना थेट प्रशासनाकडून सेवा व न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी (एरंडोल) मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, मंडळ अधिकारी मोहन महाजन, हेमंत महाजन, आरिफ शेख, राकेश पवार, किरण तायडे, प्रकाश जामोदकर, दीपक पाटील, तालुका कृषी अधिकारी देसाई, वाघ, उपअधीक्षक भूमी अभिलेख रेखा तायडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सोनवद बु.च्या सरपंच उज्ज्वला पाटील, प्रेमराज पाटील, दिलीप अण्णा धनगर, निर्दोष पवार, चंद्रशेखर भाटिया, दामू पाटील, रवींद्र हरणे (पो.पा.) यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लाभार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



