महसूल अधिकारी म्हणजे ‘जीवंत बॉंब’ ! : पोलीस आयुक्तांच्या आरोपाने खळबळ

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी डिटोनेटर्स बनले असून याचमुळे भूमाफियांचे फावले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना अतिरिक्त अधिकार द्यावेत, अशा मागणीचे पत्र नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय  यांनी महासंचालकांना लिहल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

नाशिकेचा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात महसूल खात्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पांडेय यांनी महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे म्हणजेच पर्यायाने स्वतःकडे द्यावेत अशी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आरोप केला आहे  की, या विभागाकडून अधिकाराचा योग्य वापर होत नाही. महसूल अधिकारी ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे ‘जिवंत बॉम्ब’ तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून हे पाऊल उचलावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पांडे यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक आयुक्तालय उभारण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात सध्या पोलीस आयुक्तांचे ३५०० तर ग्रामीण विभागाचे ३६०० पोलीस मनुष्यबळ आहे. त्यातून एकच पोलीस आयुक्तालय साकारावे.  सारे अधिकार पोलीस आयुक्तांकडे असावेत. ग्रामीण पोलीस दल आयुक्तालयात आल्यास गतिमान प्रशासन कार्यरत होईल. ग्रामीण आणि शहर हद्द राहणार नाही. शेवटी या सार्‍यांच्या कामाचे स्वरूप एकच आहे. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी कार्यालय शाखा ही पोलीस आयुक्तालयातच विलीन करावी. एकाच जिल्ह्यात शहर आणि जिल्हा या दोन यंत्रणा असू नयेत. सर्व जिल्ह्यासाठी फक्त पोलीस आयुक्तालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दीपक पांडेय यांनी महसूल खात्यावर अतिशय गंभीर आरोप केल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरून आता महसूल कर्मचार्‍यांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

Protected Content