चाळीसगाव प्रतिनिधी । आधीच अडचणीत असलेल्या नाभिक बांधवांवर राज्य सरकारच्या मिनी लॉक डाऊन जाहीर केल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यावसायिकांनी आ. मंगेश चव्हाण यांना भेटून निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली असता सलून व्यावसायिकांना आपले दुकान सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील नाभिक समाजावर हा खूप मोठा अन्याय होत आहे. वर्षेभरापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडलेले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून व्यवसायधारकाने घरातील दागदागिने विकून दुकान भाडे, घरभाडे व वीज बिलाचा भरणा केलेला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरतांना नाभिक समाज मेटाकुटिस आलेला आहे. अशात परत लॉकडाऊन करून सलून व्यवसायावर बंदी घातलेली असल्याने आता जगायचे कसे हा प्रश्न नाभिक समाजासमोर पडलेला आहे. नाभिक समाजाचे तरुण कार्यकर्ते गणेश सुभाष सैंदाणे, वय-३२ वर्षे, रा-वैजापूर, ता.चोपडा, जि.जळगाव यांनी लॉकडाऊनच्या कारणामुळे दि.७ एप्रिल २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. अशीच अवस्था जवळपास सर्व सलून व्यावसायिकांची आहे. कै.गणेश सैंदाने यांच्या कुटुंबास शासनाने १० लाखाची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी नाभिक समाजाची मागणी असून तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी निवेदन दिले आहे. नाभिक समाजाच्या न्याय्य व रास्त मागण्या मान्य न झाल्यास मला लोकप्रतिनिधी या नात्याने नाभिक बांधवांच्या सोबत तीव्र आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल व त्यामुळे जर विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा देखील आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे दिला आहे.