
रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आयोजित रोग निदान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ४७१ रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. यात २७३ महिला आणि १९८ पुरुषांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेवा हाच संकल्प – भारत हीच पहिली प्रेरणा’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी यांनी अभियानामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, महिला आणि मुलांच्या आरोग्य सेवा मजबूत करणे, सेवेची गुणवत्ता सुधारणे आणि आरोग्य जागरूकता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पद्माकर महाजन म्हणाले की, सरकारचे हे आरोग्य अभियान देशभरातील महिला आणि मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून सर्वांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी या अभियानाचे महत्त्व सांगितले. २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीनिमित्त देशभरात १ लाख आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत, ज्यात महिला आणि बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. महिलांनी या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तेजस खैरनार, ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. किशोर वाणी, दंत चिकित्सक डॉ. हर्षल चांदा, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुदत्त घेटे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. भगवान कुयते आणि नेत्र चिकित्सा अधिकारी अनंत लांडगे यांचा समावेश होता.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक सोलंकी, डॉ. सोनाली बारेला, डॉ. अल्पना चौधरी, डॉ. राजेश्वरी गजरे, अधिपरिचारिका श्रीमती रीता धांडे यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



