
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ (ड) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भिकन मुरलीधर हिवराळे यांच्याविरोधात पसरविल्या जात असलेल्या अपप्रचारावर त्यांनी आज जाहीर भूमिका मांडत सत्य लोकांसमोर आणले आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

भिकन हिवराळे यांनी सांगितले की, विरोधी गटाकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप पसरवले जात असून मी विरोधकांकडून पैसे घेतले आहेत व त्यांना पाठिंबा दिला आहे, अशी बदनामी केली जात आहे. मात्र या सर्व गोष्टी निराधार, खोट्या आणि राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. माझी उमेदवारी ही जनतेच्या सेवेसाठी आहे, कुणाच्या दबावाखाली किंवा आर्थिक व्यवहारांमुळे नव्हे,” असे ते ठामपणे म्हणाले.
हिवराळे यांनी आपण शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीशी पूर्णपणे एकनिष्ठ असल्याचेही पुन्हा अधोरेखित केले. “मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. माझा संघर्ष हा माझ्या पक्षाच्या विचारसरणीसाठी आणि प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आहे. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते अफवा, खोटे आरोप आणि अपप्रचाराच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
प्रभाग ७ (ड) मधील मतदारांनी अशा अपप्रचाराला बळी न पडता सत्य ओळखावे, असे आवाहनही हिवराळे यांनी केले. स्थानिक विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत सुविधा यावर आपण लक्ष केंद्रित केले असून याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा विश्वास आणि पाठिंबा आपल्यासोबत असल्यानेच विरोधक अस्वस्थ झाले असून त्यामुळेच अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या साऱ्या घडामोडींमुळे प्रभाग ७ (ड) मधील निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले असून, सत्य आणि असत्य यातील फरक ओळखून मतदार आपला निर्णय देतील, असा विश्वास भिकन हिवराळे यांनी व्यक्त केला आहे. जनतेशी थेट संवाद साधत आपण पुढील काळातही विकासाचा अजेंडा मांडत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.



