मातंग समाजाच्या मागण्या तात्काळ सोडवा, अन्यथा आंदोलन; लहुजी सेनेचे निवेदन (व्हिडीओ)

पाचोरा नंदू शेलकर । मातंग समाजाच्या विविध महत्वपूर्ण मागण्या तात्काळ सोडविण्यासाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या मागण्या तात्काळ न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसुचित जाती मातंग नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत तसेच सन-१९४९ चा पुरावा नसल्या कारणाने जात प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक व शासकीय योजनांपासून वंचीत राहत आहे. या विषयावर शासनस्तरावर योग्य निर्णय व्हावा, अनुसुचित जातीसाठीच्या उपलब्ध आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करुन मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण प्रदान करण्यात यावे, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय – निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी, जगविख्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला १ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून समाजाच्या विकासाला चालना देण्यात यावी, क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे, साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचे लवकरात लवकर नवनिर्माण करण्यात यावे, मुंबई विद्यापीठाला साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देवुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अधिकृतपणे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, केंद्र व राज्य सरकारकडुन अनुसुचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये अनुसुचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायोजित निधीची तरतूद करण्यात यावी, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशींची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्रीय कायदा मंत्रालयाचे सचिव बी.एन. लोकुरे यांचे अध्यक्षतेखाली व न्यायमूर्ती उषा मेहरा आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसुचित जाती संवर्गातील दुर्लक्षित घटकांसह मातंग समाजाला सामाजिक न्याय व विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्था स्वतंत्रपणे तात्काळ सुरू करण्यात यावी, पद्मश्री दादासाहेब गायकवाड सबळीकरण, व स्वाभिमान योजने अंतर्गत प्राधान्यक्रमाने वंचित मातंग समाजासाठी मोठ्या अर्थसहाय्य तरतुदीने व विशेष मोहीमेद्वारे लाभ उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना देण्यात आले. 

 

निवेदन देतेवेळी लहुजी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र युवा संघटक अध्यक्ष विनोद कांबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अनिल काळे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख राजु गायकवाड, पाचोरा तालुका अध्यक्ष आबा गायकवाड, भडगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र मरसाळे, मनोज भालेराव, मोहन मरसाळे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content