महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, या मागणीसाठी विधानसभेत सोमवारी ठराव मंजूर करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव सभागृहात मांडला होता, ज्याला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. अखेर हा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाही, हा ऐतिहासिक ठराव मात्र एकमताने संमत झाला. हा ठराव प्रगत, पुरोगामी आणि सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. तसेच, हा ठराव संपूर्ण देशवासीयांच्या लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, असेही ते म्हणाले.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेच्या दिशेने मोलाचे योगदान दिले. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या या दांपत्याने समाजाच्या दुर्बल, वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज देशभरातील महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती साधली आहे, याचे श्रेय या थोर समाजसुधारकांच्या दूरदृष्टीला जातो. शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे स्मरण करत महाराष्ट्र विधानसभेने हा ठराव संमत केला आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात नवा अध्याय जोडला गेला आहे. या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आणि केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने ‘भारतरत्न’ पुरस्काराचा दर्जा अधिकच उंचावल्याचे मान्यवरांनी सांगितले.

Protected Content