नवी दिल्ली वृत्तसंस्था । स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि बलात्कार गुह्यातील आरोपी स्वामी नित्यानंद विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या घटनेमुळं चर्चेत आला आहे. ‘कैलास’ नावाचं स्वतंत्र हिंदूराष्ट्र स्थापन केल्याचा दावा करणाऱ्या नित्यानंदने आता या कथित राष्ट्राच्या शिखर बँकेची स्थापनाही केली आहे. या बँकेचं त्यानं ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ असं नामकरणही केलं आहे. गणेश चतुर्थीला तो या बँकेचं चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना डांबून ठेवण्यासह इतर बलात्काराचे आरोप आहेत. त्याने ५० न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलनं त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे. अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी करोनाच्या संकटामुळं थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी याच महिन्यांत कर्नाटकमध्ये होणार आहे.