युद्धपातळीवर बचावकार्य सुरू ; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत : मुख्यमंत्री

EBcEiICXsAEW97e

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) पूरपरिस्थितीची हवाई पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. पाहणीनंतर पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.

 

गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

सांगलीतील परिस्थिती अतिशय विकट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. सोबतच, कोल्हापूरचा हवाई दौरा केला तरीही सांगली आणि सातारातील अनेक ठिकाणी पोहोचता आले नाही. तशी परवानगी फक्त बचावकार्य करणाऱ्या दलांना आहे. विरोधकांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी एअर लिफ्टिंगची मागणी केली. त्यावर बोलताना एअर लिफ्टिंग करणे कठिण आहे. सर्वांनाच त्या स्वरुपाच्या बचावकार्याचे प्रशिक्षण नसते असे फडणवीस म्हणाले आहेत.

Protected Content