कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १७ गोवंश जनावरांची सुटका; दोन आरोपी अटकेत

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील इस्लामपुरा भागात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १७ गोवंश जातीच्या जनावरांची शनिपेठ पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अवैध गोवंश तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना इस्लामपुरा भागातील एका बंदिस्त जागेत गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली.

बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने के. के. उर्दू हायस्कूलच्या मागील दोन बंदिस्त जागांवर छापा टाकला. १७ गोवंश जनावरे सापडली. या जनावरांची एकूण किंमत १ लाख ७० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत शेख इब्राहीम अब्दुल कुरेशी (वय 33, रा. इस्लामपुरा, मदीना मशीद जवळ, जळगाव) आणि सादीक मेहमुद खान (वय 29, रा. इस्लामपुरा, भवानीपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका केलेल्या जनावरांना महानगरपालिका जळगावच्या कोंडवाड्यात तात्पुरते ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी श्री. चोपडे यांनी या जनावरांची तपासणी केली. त्यानंतर, पुढील संगोपनासाठी आर. सी. बाफना गौशाळा, कुसुंबा येथे त्यांना हलवण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हवालदार विजय खैरे, गिरीश पाटील, किरण वानखेडे, गजानन वाघ, पोलीस शिपाई पराग दुसाने तसेच कंपनी नायक अनिल पाटील आणि 10 होमगार्ड कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Protected Content